
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. गेल्या ९ दिवसांपासून फरार असलेल्या चव्हाणने अटक टाळण्यासाठी मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या सात पथकांनी त्याचा शोध घेतल्यानंतर, अखेर नेपाळ सीमेवर त्याला अटक करण्यात आली .
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं. बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला त्याने बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. त्याच्यावर बाळाची हेळसांड केल्याचा आणि वैष्णवीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे .
पोलिस तपासात उघड झाल्यानुसार, चव्हाणने पुण्याहून रायगड, दिल्ली, गोरखपूरमार्गे नेपाळ गाठलं. नेपाळमध्ये काही काळ राहिल्यानंतर, तो पुन्हा भारतात येण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. या अटकेनंतर, वैष्णवी हगवणे प्रकरणात पुढील तपास अधिक सखोल होणार आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी सुरू केली आहे.