
Satara Doctor Death : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. या घटनेवर साताऱ्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. जर संबंधित महिला डॉक्टरने वेळेत कुणाशी तरी मन मोकळे केले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते.” त्यांनी यासोबतच स्पष्ट केले की या घटनेचा प्रशासकीय बाबींशी थेट संबंध नाही.
या प्रकरणाचा तपास एएसपी वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्या गेल्या दोन दिवसांपासून फलटणमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा आणि साक्षीदारांची चौकशी करून घटनेचे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कडूकर म्हणाल्या, “जर डॉक्टर तरुणीला मानसिक ताण किंवा त्रास होत होता, तर त्यांनी आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलले असते, तर योग्य वेळी मदत मिळाली असती. अशा घटना समाजाला जागरूक करणाऱ्या आहेत.”
या घटनेत वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस प्रशासनातील विसंवादामुळे काही दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न विचारल्यावर कडूकर यांनी स्पष्ट केले की, “आरोपींवर कायदेशीर कारवाई करणे आणि पीडितेला न्याय देणे हे दोन्ही विभागांचे सामायिक कर्तव्य आहे. ही घटना अपवादात्मक असून यामागे कोणताही प्रशासकीय मतभेद कारणीभूत नाही.”
घटनास्थळ असलेल्या हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या चित्रीकरणानुसार, डॉक्टर तरुणी आत्महत्येच्या दिवशी एकटीच हॉटेलमध्ये गेल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात पीएसआय गोपाळ बदने व घरमालक प्रशांत बनकर यांची नावे तरुणीने हातावर लिहून ठेवल्याने तपासात महत्त्वपूर्ण वळण आले आहे.
पीएसआय गोपाळ बदने, ज्याच्यावर पीडितेने चार वेळा बलात्काराचा आरोप केला आहे, तो काही दिवस फरार होता. अखेर शनिवारी रात्री तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला चौकशीसाठी नेण्यात आले असता त्याने “आपल्याला अडकवले जात आहे” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरा संशयित प्रशांत बनकर याला कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.