
परळी: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथे आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना अत्यंत महत्त्वपूर्ण असा 'मैत्री'चा प्रस्ताव दिला आहे. समाजा-समाजांमधील वाढलेली दरी मिटवून सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि मराठा आरक्षणावरील आपली भूमिकाही स्पष्ट केली.
पंकजा मुंडे यावेळी स्पष्टपणे म्हणाल्या की, "मी मनोज जरांगे-पाटलांच्या विरोधात कधीच बोलले नव्हते. दुर्दैवाने, लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला." त्या पुढे म्हणाल्या, "जरांगे-पाटलांनी पुन्हा उपोषण केले तरी, मी पालकमंत्री म्हणून त्यांना भेटायला, त्यांची विचारपूस करायला तयार आहे. मात्र, मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही."
सामाजिक सलोखा हाच आपला उद्देश असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी जरांगे-पाटलांना थेट आवाहन केले. त्या म्हणाल्या, "मी मनोज जरांगे यांना सांगू इच्छिते की, आपल्या समाजांमधील दरी आता मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व होते, तेच व्यक्तिमत्व माझेही आहे. मी माझ्या जातीचा असला, तरी चुकीच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही." त्यांनी आरक्षणावरील आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली: "मी नेहमीच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम होते."
लोकसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "ज्यांनी माझे वाईट चिंतले नाही, ते सर्वजण आज व्यासपीठावर आहेत. मला कोणाचाही राग आलेला नाहीये." पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी आपले जीवन संपवल्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. "मी लोकसभेला थोडक्यात हरले, पण एकमेव विधान परिषदेची आमदार आहे, जी आज मंत्रिमंडळात आहे," असे त्यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, "आता नव्या उमेदीने कामाला लागा. मी तुमच्या फक्त सुखात नाही, तर दुःखात आणि संघर्षातही तुमच्यासोबत आहे." आगामी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी युतीवरही भाष्य केले: "अजित पवार यांच्यासोबत युतीची चर्चा झाली आहे. काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. तुम्ही जास्त डोकं न लावता फक्त काम करा. स्वबळाची तयारी सुरू ठेवा."
दररोज ४०० लोकांना भेटत असल्याचे सांगून त्यांनी जनसंपर्कावर भर दिला आणि कार्यकर्त्यांना इतर ठिकाणच्या उमेदवारांसाठी आपल्याकडे येऊ नका, असे स्पष्ट निर्देश दिले.