पावसामुळे वाहून गेला रस्ता, आईचा वाचवण्यासाठी मुलासह गावकरी एकवटले, पाहा हृदयस्पर्शी व्हिडीओ

Published : May 28, 2025, 01:04 PM IST
Viral Video

सार

सांगलीमध्ये तुफान पावसामुळे रस्ता वाहून गेल्याची स्थिती निर्माण झालीये. अशातच एका वयोवृद्ध महिलेला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sangali News : गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडी गावाला जोडणारा रस्ता पावसात वाहून गेल्याने, या गावाचा संपर्क तुटला आहे. अशाच परिस्थितीत, गावातील ८२ वर्षांच्या इंदुबाई यांना मेंदू विकाराचा झटका आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज होती, पण रस्ताच नसल्यानं परिस्थिती बिकट झाली.

गावाने दाखवली माणुसकीची नाळ

इंदुबाई यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यावर, सर्व गावकरी धावपळ करत एकवटले. त्यांच्या मदतीसाठी कोणीही मागे राहिलं नाही. रस्ता वाहून गेल्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नव्हती. अशा कठीण परिस्थितीत, ग्रामस्थांनी स्ट्रेचरवर ठेवून इंदुबाईंना अर्धा किलोमीटर पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत नेलं. त्या क्षणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

 

 

पावसाने वाहून नेलेला रस्ता आणि तुटलेली संपर्क व्यवस्था

हुबरवाडी गावाजवळ असलेला ओढ्यावरचा रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे, त्यामुळे वाहनांची वर्दळच थांबली आहे. शिराळा तालुक्यातील कोकरूड-शिराळा मुख्य रस्त्याजवळ बिळाशी गाव आहे, आणि त्याच्या काही अंतरावरच हुबरवाडी आहे. इथल्या संपर्क व्यवस्थेवर पावसाने जबरदस्त परिणाम केला आहे. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवणंही अवघड झालं आहे.

ग्रामस्थांनी दाखवलेलं धैर्य आणि डॉक्टरांची तत्परता

ग्रामस्थांच्या धैर्यामुळे आणि डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारामुळे इंदुबाईंचा जीव वाचला. गावकऱ्यांनी एकजुटीने दाखवलेली ही माणुसकी आणि तत्परता समाजाला दिशा देणारी आहे. मात्र या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. रस्त्याचं काम तातडीनं सुरू करून अशा अडचणी टाळाव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सध्या सांगली जिल्ह्यातील अनेक छोट्या गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करून पुन्हा संपर्क साधता येईल अशी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने एकदा पुन्हा ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कमकुवत अवस्थेचा सवाल उभा केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!