नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी आमदार निर्मला गावित यांचा शिंदे गटात प्रवेश

Published : May 28, 2025, 12:33 PM ISTUpdated : May 28, 2025, 02:42 PM IST
Nirmala Gavit

सार

उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. खरंतर, इगतपुरीच्या माजी आमदार निर्माला गावीत यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते.

Maharashtra : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत आहेत. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सत्ताधारी पक्षांकडून सतत धक्के बसत आहेत. शिंदे गट आणि भाजपकडून सतत खिंडार पाडले जात असून अनेक मोठे नेते आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक जबर धक्का बसला आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी बुधवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

हे घडण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता महिला नेत्या निर्मला गावित यांच्या पक्षत्यागामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटासाठी राजकीय अडचणी वाढल्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

 

 

निर्मला गावित यांची राजकीय पार्श्वभूमी

निर्मला गावित या इगतपुरी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी 2019 साली शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निर्मला गावित यांचे वडील माणिकराव गावित हे नंदुरबार मतदारसंघातून सलग 9 वेळा लोकसभेचे खासदार राहिले होते, आणि त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं बोललं जात होतं, मात्र त्यांनी ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनीही शिंदे गटाची वाट धरली आहे.

ठाकरे गटाला दोन दिवसात दोन मोठे झटके

नाशिकमध्ये अवघ्या दोन दिवसांत ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा या जिल्ह्यात प्रभाव असला तरी, शिवसेनेला विधानसभेत एकही जागा मिळवता आलेली नाही. यामुळे पक्ष कमजोर झालेला असताना सत्ताधारी गट स्थानिक पातळीवर आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरे गटात फूट

‘ऑपरेशन टायगर’च्या अंतर्गत, शिंदे गटाने राजन साळवी, संजना घाडी, नरेंद्र दराडे यांसारख्या ठाकरे गटातील अनेक प्रमुख नेत्यांना आपल्या गोटात खेचले आहे. आता निर्मला गावित यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट नाशिकमध्ये आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गटासाठी आव्हान अधिकच कठीण होणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!