
मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात आता राज्याच्या राजकारणात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा समोर येताना दिसत आहे. खरंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज (27 जून) एक महत्त्वाची घोषणा करत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणणारा फोटो शेअर केला होता. यानंतर आता दिवा शहरात शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो झळकत असून, आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचाही समावेश आहे. बॅनरवर “मराठीसाठी, मातीसाठी, महाराष्ट्रासाठी एक व्हा” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
मनसे-ठाकरे गट नेत्यांचेही एकत्र फोटो
या बॅनरवर मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचाही एकत्र फोटो झळकतो आहे. बॅनरद्वारे “५ जुलैच्या मोर्चासाठी सर्वांनी या” असे थेट आवाहन करण्यात आले आहे.
ठाकरे गटाचा शिंदे गटावर टोलाही
शिवसेना (ठाकरे गट) चे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी मोर्चासाठी दिवेकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करताना, शिंदे गटावर टीका केली. “शिंदे गट भाजपच्या पायघड्या घालतो आहे, त्यांना मराठी अस्मिता राहिलेली नाही”, असा टोला त्यांनी लगावला.
कळव्यात बॅनरवर शरद पवारांचाही फोटो
पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा देखील पाठिंबा मिळाला असून, तेही मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे कळव्यात लावण्यात आलेल्या नव्या बॅनरवर आता शरद पवार यांचाही फोटो झळकत आहे. बॅनरवर “मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता ठाकरेंच्या नेतृत्वात आवाज उठवायचा आहे”, असा मजकूर देण्यात आला आहे.
मनसेला ठाकरे गटाचे आवाहन
ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “डोंबिवलीतून मनसे आणि ठाकरे गटाची एकजूट सुरू झाली आहे. ५ जुलैचा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत, ही सर्व मराठी जनतेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.”ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी बांधवांसाठी लिहिलेलं एक पत्र आम्ही डोंबिवलीतील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, कलाकार यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मनसेचे नेते राजू पाटील यांना आवाहन करतो की, आपण सर्वजण एकत्र लोकलने जाऊन मोर्चात सहभागी होऊया.”
हिंदी सक्तीविरोधात मोर्चा का?
महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांतून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविरोधात मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक अस्मितेचं रक्षण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं संजय राऊत यांनी सूचित केलं आहे.