
Pune : दिवाळीच्या सणानिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते. दिवसाला जवळपास दोन लाख प्रवासी स्वारगेट एसटी स्थानकावरून प्रवास करतात. यासाठी एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात येतात. मात्र, प्रवाशांना गर्दीतून आणि धोकादायक पद्धतीने जेधे चौक ओलांडावा लागतो.
स्वारगेट मेट्रो स्थानक सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. उद्घाटनावेळी सातारा रस्त्यावरील प्रवेशद्वार खुले करण्यात आले होते. त्यानंतर लवकरच एसटी स्थानकाला जोडणारा भुयारी मार्ग आणि गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या बाजूचे प्रवेशद्वार सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. पण एक वर्ष उलटूनही भुयारी मार्ग सुरू झालेला नाही.
एसटी स्थानकाला जोडणारा भुयारी मार्ग दिवाळीपूर्वी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप बरीच कामे बाकी असल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाही दिवाळीत प्रवाशांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागणार आहे.
जेधे चौकातील मर्यादित जागेमुळे टनेलिंग आणि खोदकामाचे काम वेळखाऊ झाले आहे. चौक पूर्णपणे बंद करता येत नसल्याने कामात अडथळे आले. तांत्रिक अडचणींमुळे दिवाळीपूर्वी भुयारी मार्ग सुरू करणे शक्य नाही.
हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांना एसटी स्थानक आणि मेट्रो स्थानक यांदरम्यान थेट पादचारी प्रवेश मिळेल. त्यामुळे जेधे चौकातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि बेकायदा पार्किंगचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.