Pune Rain : पुण्यात 130 वर्षांनंतर विक्रमी पाऊस; अवकाळी सरींनी राज्यात हाहाकार, शेतीला मोठा फटका

Published : Apr 03, 2026, 08:30 AM IST
Pune Rain

सार

Pune Rain : राज्यात अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यात विक्रमी 65 मिमी पावसाची नोंद झाली. 

Pune Rain : राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी परिस्थिती आणखी गंभीर केली असून, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी एकूणच या बदलत्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुण्यात 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद

पुणे शहरात 2 एप्रिल रोजी तब्बल 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा एप्रिल महिन्यातील एका दिवसातील गेल्या 130 वर्षांतील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी 1896 साली 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाचा पाऊस ऐतिहासिक ठरला आहे.

वादळी पावसामुळे दुर्घटना, महिलेचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. गंगाधाम चौकात एक मोठे होर्डिंग कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तर झाड कोसळल्यामुळे रंजना नवनाथ गिरी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत अडकलेल्या इतर दोघांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले.

ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस, गारपीट

हा पाऊस केवळ शहरापुरता मर्यादित नसून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे एक तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे शेती आणि वाहतुकीवर परिणाम झाला.

अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ

उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बहुतांश लोकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्याने त्यांना अचानक पावसाचा सामना करावा लागला. शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक