भुजबळांचे आव्हान जरांगे स्वीकारणार का?, 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. छगन भुजबळ यांनी त्यांना आव्हान दिले होते की ते 8 जागा जिंकून दाखवावेत. आता जरांगे हे आव्हान स्वीकारण्याची शक्यता आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 12, 2024 6:36 AM IST / Updated: Aug 12 2024, 12:10 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. यावरून छगन भुजबळ यांनी तुम्ही 288 उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि 8 जागा निवडून आणून दाखवा, असे आव्हान मनोज जरांगेंना दिले होते. आता मनोज जरांगे छगन भुजबळ यांचे आव्हान स्वीकारण्याची चिन्ह दिसून येत आहेत. मनोज जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय 29 ऑगस्टला जाहीर करणार आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुणे येथे शांतता रॅलीत संबोधित करताना अचानक भोवळ आली. त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता मनोज जरांगे यांना उपचारानंतर दवाखान्यातून सोडण्यात आले. डीहायड्रेशन आणि अशक्तपणा असल्याने काल रात्री सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आता तब्येत ठीक असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ते आता अहमदनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

निवडणूक लढवण्याचा निर्णय 29 ऑगस्टला जाहीर करणार : जरांगे

अहमदनगरला रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला आराम करायला लावला आहे. पण, मी उपचार घेऊन माझा दौरा पूर्ण करणार आहे. छगन भुजबळ आणि अनिल बोंडे यांना महत्त्व देत नाही. राज्यात आम्ही 288 विधानसभा जागा लढवणार आहोत. सर्व राखीव जागांवर मराठा उमेदवार निवडून आणणार आहोत. इतर जागेवर इतर जातीतील उमेदवार निवडून आणणार आहोत. 29 ऑगस्टला निवडणूक लढणार की नाही याबाबत निर्णय घेणार, असे त्यांनी यावेळी म्हटले. आता मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांचे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले होते छगन भुजबळ?

छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर आम्ही 288 उमेदवार उभे करणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणतात. तुम्ही आधी 88 उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त 8 उमेदवारच निवडून आणून दाखवा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझे तुम्हाला आव्हान आहे की, तुम्ही विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभेच करुन दाखवा, असे त्यांनी म्हटले होते.

आणखी वाचा :

गचांडीची भाषा?, राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना खोचक प्रत्युत्तर

 

Share this article