मराठवाड्यात सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव, पीक वाचवण्यासाठी तातडीचे उपाय

महाराष्ट्रात सोयाबीनवर पुन्हा एकदा पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. या रोगांना रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाद्वारे सुचवलेल्या उपाययोजना जाणून घेऊयात.

Rameshwar Gavhane | Published : Aug 12, 2024 6:06 AM IST / Updated: Aug 12 2024, 12:11 PM IST

महाराष्ट्रात खरीपात मराठवाड्यात सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या सोयाबीनवर आता पुन्हा एकदा पिवळ्या मोझॅकसह विषाणूजन्य हिरवा मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने सोयाबीन उत्पन्नात जवळपास ७५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलंय.

मागील वर्षी सोयाबीन शेतकऱ्यांना पावसाच्या तऱ्हेमुळे मोठे नुकसान झाले होते. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाने माना टाकल्याचे चित्र होते. परिणामी अजूनही शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा हा रोग पिकावर पसरला तर यंदाही सोयाबीन धोक्यात येण्याची शक्यता आहे.

या रोगाला रोखता येते का?

या दोन्ही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन प्रादुर्भाव ग्रस्त झाडांना फुले आणि शेंगा लागत नाहीत त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन करता येते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत नेमकं त्या काय आहेत हे जाणुन घेऊयात..

सोयाबीनवरील मावा,पांढरी माशी आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन

1. काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी.

2. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा.

3. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

4. मोझॅक(केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

5. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेडसी 50 मिली (2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा असिटामिप्रीड 25%+बाइफेन्थ्रीन 25 % डब्ल्यूजी 100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49%+इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली (7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने)यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.

6. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.

7. फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.

8. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा.

9. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.

10. कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावे.

11. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

12. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी.

आणखी वाचा :

पीएम मोदींनी शेतकऱ्यांना 109 नवीन पीक वाण दिले भेट, सेंद्रिय शेतीवर केली चर्चा

 

Share this article