
Pandharpur Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा केली. दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी दांपत्य म्हणून नांदेड जिल्ह्यातील पोटा गावचे रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर यांनी महापूजेत सहभाेग घेतला. मागील 20 वर्षांपासून सातत्याने वारी करणाऱ्या वालेगावकर दांपत्याचा मंदिर समितीच्या वतीने तुळशीमाळ घालून सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पत्नी व मुलासह, मंत्री भरत गोगावले आणि जयकुमार गोरे उपस्थित होते. यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांना पुजेत सहभागी होण्याची संधी मिळाली, हेही विशेष.
महापूजेच्या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मानाच्या वारकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत एसटी प्रवास देण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली. “चौथ्यांदा महापूजेसाठी संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पदं-प्रतिष्ठा विठ्ठलांच्या कृपेनेच मिळाली,” असे ते म्हणाले. सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होवो, संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध आणि आनंदी होवो यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एमटीडीसीची जागा 30 वर्षांसाठी मंदिराला देण्याचे आणि चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले.
वारकरी हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “आषाढी आणि कार्तिकी वारी ही वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी आहे. या सोहळ्याकरिता स्वच्छता, पाणी, आरोग्यसेवा, चंद्रभागेच्या तीरावर सुविधा अशा सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.” राजकीय पदापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वारकरी म्हणजेच शेतकरी यावर भर देत त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली 32 हजार कोटींची मदत आणि जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय याची माहिती दिली. “आज बळीराजावरील संकटे दूर व्हावीत यासाठीच पांडुरंगाच्या चरणी आलो,” असे शिंदे म्हणाले.