
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी वैष्णवीने आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली असून आज त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं.
हगवणे कुटुंबियांचे वकील विपूल दोषी यांनी कोर्टात युक्तिवाद करताना अनेक वादग्रस्त दावे केले.
त्यांनी विचारलं –
"नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ म्हणायचं का?"
"प्लॅस्टिकच्या छडीने मारणं हत्याराने हल्ला म्हणायचा का?"
या प्रश्नांनी कोर्टात आणि सार्वजनिक चर्चेत खळबळ उडवली आहे.
त्याचबरोबर त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय घेत, ती एका अनोळखी व्यक्तीसोबत चॅट करत होती, त्याच व्यक्तीने तिला नकार दिला आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा गंभीर आरोप केला.
सरकारी वकिलांनी या आरोपांना फेटाळत स्पष्ट सांगितलं की, “वैष्णवीच्या मृत्यूवेळी तिच्या शरीरावर ३० जखमा आढळल्या, त्यातील १५ जखमा मृत्यूपूर्वी २४ तासांपूर्वीच्या आहेत. हे छळ नव्हे तर सततचा हिंसाचार आहे.” तसेच त्यांनी असा युक्तिवाद केला की, "चॅटची माहिती सादर करण्यात आली नाही, वैष्णवीच्या मृत्यूच्या मागील मानसिक आणि शारीरिक छळाचा सखोल तपास आवश्यक आहे. ५१ तोळे सोनं कोणत्या बँकेत गहाण ठेवण्यात आलं, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही."
वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केलेल्या फॉर्च्युनर कारच्या मागणीच्या आरोपावर हगवणे वकिलांनी प्रत्युत्तर दिलं की, “आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, आम्हाला फॉर्च्युनरची गरजच नाही!” पण वैष्णवीच्या कुटुंबियांनी कोर्टात ठाम सांगितलं की, "कारची मागणी सासरकडूनच झाली होती."
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, तर सासू, नणंद आणि पती यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वैष्णवी हगवणे प्रकरण हे केवळ कौटुंबिक वाद नाही, तर स्त्रीच्या अस्मितेचा, छळाच्या व्याख्येचा आणि कायद्याच्या व्याख्येतील संवेदनशीलतेचा गंभीर विषय ठरत आहे. आरोपींचे वकील जिथे वैष्णवीच्या वर्तनावरच प्रश्न उपस्थित करत आहेत, तिथे सरकारी यंत्रणा आणि तिचं कुटुंब तिच्यासाठी न्याय मिळावा यासाठी लढत आहेत.
हा खटला आता सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा बनत चालला आहे. पुढील सुनावणीत काय नवीन तथ्य समोर येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.