Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू युती जाहीर करणार ; मुंबईसह नाशिकमध्येही शिवसेना UBT-मनसे एकत्र

Published : Dec 24, 2025, 09:27 AM IST
Municipal corporation election 2026

सार

Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती आज अधिकृतपणे जाहीर होणार आहे. 

Municipal Corporation Election 2026 : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे बंधूंची बहुचर्चित युती अखेर अधिकृतरित्या जाहीर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज युतीची घोषणा होणार असून मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर सात महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. युतीच्या घोषणेसोबतच जागावाटपाचा आराखडा आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्र पक्षांना किती जागा दिल्या जाणार, यावर अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी लवकरच या प्रश्नांवरही पडदा पडणार आहे.

नाशिक महापालिकेमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचा ‘मोठा भाऊ’ असण्याची भूमिका स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे. नाशिक मनपाच्या एकूण 122 जागांपैकी सुमारे 72 जागा शिवसेना (UBT) तर 50 जागा मनसे लढवेल, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र माकप, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू असलेल्या चर्चांनुसार या फॉर्म्युलामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि मनसेतील वाकयुद्धामुळे काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.

2017 च्या नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 35 तर मनसेने 5 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून शिवसेना दुभंगली आहे. सध्या नाशिक मनपेत शिवसेना (UBT)कडे 8 तर मनसेकडे 3 नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक जिंकण्याचे आव्हान हे मोठ्या प्रमाणावर ठाकरे ब्रँडवर अवलंबून असणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. राज आणि उद्धव ठाकरे बुधवारी दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची औपचारिक घोषणा करणार असून त्याआधी दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. याच वेळी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

पुणे म्हाडा लॉटरीला आचारसंहितेचा मोठा फटका! २ लाख पुणेकरांचे घराचे स्वप्न लांबणीवर; आता 'या' तारखेलाच निघणार सोडत
पुणेकरांनो सावधान! ख्रिसमसनिमित्त 'या' रस्त्यांवर नो-एन्ट्री; घरून निघण्यापूर्वी हे वाचा, नाहीतर ट्रॅफिकमध्ये फसाल!