
Ladki bahin yojana : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. अद्याप लाखो महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीही मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या 30 ते 40 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. जर या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी केली नाही, तर त्यांना योजनेतून अपात्र ठरवण्यात येईल. यामुळे 40 लाखांहून अधिक महिलांचा दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा लाभ थांबू शकतो.
सध्या राज्यात 2 कोटी 47 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात आहे. अपात्र लाभार्थी शोधून काढण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ई-केवायसी सक्तीची केली आहे. या प्रक्रियेमुळे चुकीच्या किंवा अपात्र नोंदी वगळल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली. तेव्हापासून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा थेट 1500 रुपये जमा केले जात आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची मानली जात असून वेळेत ई-केवायसी करणे अत्यावश्यक ठरत आहे.