
MHADA Pune Lottery 2026 : पुण्यात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवडजवळील ताथवडे येथे म्हाडा पुणे मंडळाने ७९२ घरांच्या सोडतीची घोषणा केली असून, ८ जुलै २०२६ रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेला २७ एप्रिलपासून सुरुवात होत असून, नागरिकांना घर खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
म्हाडाने काही वर्षांपूर्वी ताथवडे येथे गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. दोन टप्प्यांत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरांची विक्री आधीच पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ७९२ घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या घरांचे बांधकाम पुढील चार महिन्यांत पूर्ण होणार असल्याने जुलैमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) २४ घरे राखीव ठेवण्यात आली असून, त्यांची किंमत सुमारे ४६ ते ४७ लाख रुपये आहे. या घरांचे क्षेत्रफळ ५९ ते ६० चौ.मीटर दरम्यान आहे. तर, उर्वरित ७६८ घरे मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) असून, त्यांची किंमत ६४.५ लाख ते ६५.५ लाख रुपयांदरम्यान आहे. या घरांचे क्षेत्रफळ ६९ ते ७० चौ.मीटर आहे.
या सोडतीसाठी २७ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक नागरिक २ जूनपर्यंत अर्ज सादर करू शकतात.
३० जून रोजी पात्र अर्जांची यादी जाहीर होईल आणि ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सोडत ऑनलाइन जाहीर केली जाईल.
ताथवडे हे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्गाजवळ असल्याने या प्रकल्पाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी आणि विकसित होत असलेला परिसर यामुळे हा प्रकल्प घर खरेदीसाठी आकर्षक ठरत आहे.
ताथवडेसह म्हाडा पुणे मंडळाने वाकड, चिखली, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर आणि पुनावळे या भागांमध्येही गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत.
म्हाडा फ्लॅटसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
1. अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करा
2. लॉगिन करून योग्य योजना निवडा
3. उत्पन्न गटानुसार अर्ज भरा
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5. अनामत रक्कम भरून अर्ज सबमिट करा