Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिल; 26 लाख महिलांचा लाभ बंद होणार?

Published : Apr 27, 2026, 08:21 AM IST
Ladki Bahin Yojana

सार

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. सुमारे 26 लाख महिलांची प्रक्रिया अपूर्ण असून त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले असून 30 एप्रिल ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. मुदतवाढीच्या तीन संधी मिळूनही लाखो महिलांची प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने त्या योजनेतून अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ई-केवायसीसाठी शेवटची संधी; लाखो महिलांवर टांगती तलवार

राज्यात एकूण 2 कोटी 47 लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, सुमारे 26 लाख 34 हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. कागदपत्रांच्या त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि उशीर यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. 30 एप्रिल रोजी बँक बंद होईपर्यंत ई-केवायसी लिंक सुरू राहणार असून, त्यानंतर ही संधी कायमची बंद होऊ शकते.

गैरप्रकार उघड; सरकारची कठोर कारवाई

योजनेच्या पडताळणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुमारे 12,415 सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीररित्या या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून त्यांनी घेतलेली रक्कम परत वसूल केली जाणार आहे. याशिवाय खोटी माहिती देणारे आणि उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात वसुली केली जाणार आहे.

165 कोटींची वसुली; अपात्रांवर गंडांतर

सरकारने गैरप्रकार करणाऱ्यांकडून सुमारे 165 कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या महिला केवळ तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अपात्र ठरतील, त्यांच्याकडून आधी मिळालेली रक्कम परत घेतली जाणार नाही, असा दिलासाही देण्यात आला आहे.

बोगस लाभार्थ्यांचा धक्कादायक आकडा

या योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. सुमारे 12,757 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून सुमारे 22.96 कोटी रुपयांचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे, 6,457 बोगस महिला लाभार्थ्यांकडून सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून इशारा; लाभार्थ्यांनी तातडीने कारवाई करावी

सरकारने स्पष्ट केले आहे की 30 एप्रिलनंतर योजनेची अंतिम यादी निश्चित केली जाईल. त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ तात्काळ बंद केला जाईल. त्यामुळे पात्र महिलांनी उशीर न करता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद