
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईत धडकणार आहेत. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून राज्यभरातून मराठा समाजाला या आंदोलनाला मोठं समर्थन मिळत आहे.
गुणरत्न सदावर्तेंचा विरोध आणि तक्रार
या आंदोलनाला विरोध करत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करू देऊ नये. कारण हे आंदोलन मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर दबाव आणणारे असून, ते न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) आहे. त्यामुळे आंदोलन थांबवावे आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस महासंचालकांकडे दाखल तक्रार
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मुंबईत क्षमतेपेक्षा अधिक लोक आणून कायदा-सुव्यवस्था बिघडवली जाऊ शकते आणि त्याचा परिणाम थेट मुंबईच्या जीडीपीवर होईल, असेही त्यांनी नमूद केले. याविरोधात सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि जालना येथील पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. लवकरच आझाद मैदान पोलीस स्थानकातही तक्रार देण्यासाठी डॉ. गुणरत्न सदावर्ते आणि वकील जयश्री पाटील जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मांजरसुंबा येथील सभेत चोरी
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मांजरसुंबा येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक सभेत चोरट्यांनी मोठी चोरी केली. मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झालेल्या या सभेत सोनसाखळ्या, मंगळसूत्र, दागिने आणि रोख रकमेसह अनेक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा तोळ्यांची सोनसाखळी लंपास
सभेदरम्यान बापू नवले यांची तब्बल दहा तोळ्यांची सोन्याची साखळी चोरीला गेली असून तिची किंमत सहा लाख वीस हजार रुपये इतकी आहे. याच सभेतून दीपक जोगदंड यांची सोनसाखळी, इतर दोन जणांच्या साखळ्या आणि एका महिलेचे मनी मंगळसूत्र चोरीला गेले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.