Maharashtra Rain Updates : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याकडून आज 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published : Oct 24, 2025, 09:02 AM IST

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

PREV
16
महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

26
मुंबईत ढगाळ वातावरण आणि वादळी वारे

मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर ढगाळ आकाश राहणार असून, संध्याकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

36
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात २४ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागात पुढील दोन दिवस वातावरण दमट आणि ओलसर राहणार आहे.

46
उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, नाशिकसह चार जिल्ह्यांना अलर्ट

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना हवामान विभागाने २४ ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मात्र सध्या अलर्टच्या बाहेर आहे.

56
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा

मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड वगळता इतर पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका कायम राहील. विदर्भात बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजीही या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

66
राज्यभरात २७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज

हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यभर पावसाची परिस्थिती सक्रिय झाली आहे. या प्रणालीचा प्रभाव २७ ऑक्टोबरपर्यंत कायम राहील, ज्यामुळे राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Read more Photos on

Recommended Stories