Maharashtra Rain : मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; राज्यातील अनेक भागांसाठी IMD चा यलो अलर्ट

Published : Aug 03, 2026, 08:15 AM IST
rain holiday

सार

राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने  अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर सकाळीही पावसाची रिपरिप कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, मुंबई आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानुसार, वातावरणातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा, रायगड, पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही दिवसभर मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

देशभरात पावसाचा कहर

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गुजरात आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून बचावकार्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागत आहे. हवामान विभागाने देशातील 22 राज्यांमध्ये वादळाचा इशारा दिला आहे. येथे ताशी 30 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भात अतिवृष्टीचा फटका; पाच जण वाहून गेले

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यांतील तब्बल 45 तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत पुराच्या पाण्यात पाच जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

72 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टी आणि पूरामुळे विदर्भातील शेतीला मोठा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे 72 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, कापूस आणि संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पुरामुळे 120 हून अधिक लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुढील दोन दिवसांचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरातील पावसाची तीव्रता पुढील काही दिवसांत काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस कर्नाटकच्या किनारी भागात आणि दक्षिण अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रातही काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक