Weather Update : स्वातंत्र्यदिनी मुसळधार पावसाचा इशारा,भाजीपाला व खरीप पिकांवर संकट; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सूचना

Published : Aug 15, 2025, 10:36 AM IST
heavy rain in MP

सार

भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील विविध भागांचा पावसाचा अंदाज वर्तवला असून, सध्या राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील विविध भागांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. सध्या राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व भागांसाठी हवामान विभागाने स्वतंत्र अंदाज जारी केला असून, अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या तीनही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने पुणे व सातारा घाटमाथ्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

विदर्भ

विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, या सर्व भागांसाठी येलो अलर्ट जारी आहे. पावसासोबत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता आहे.

मराठवाडा

लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यांत मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि सुमारे 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट लागू आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला गेला आहे.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन 

१. भाजीपाला संरक्षण

सध्या भाजीपाला पीकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी यांसारख्या पिकांमध्ये पाणी साचल्यास मुळकुज व कीडरोग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ओलसरपणा कमी करण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) करावे. तसेच काकडी, दोडका, भोपळा यांसारख्या पिकांचे फळ पिकल्यावर लगेच काढावे, अन्यथा पावसामुळे सडण्याची शक्यता आहे.

२. खत व्यवस्थापन

जास्त पावसात खतांचा अपव्यय टाळण्यासाठी पावसानंतरच द्रवरूप खतांची फवारणी करावी.

३. किडरोग नियंत्रण

पावसाळ्यात पानांवर डाग, कूज किंवा बुरशीजन्य रोग वाढतात. आवश्यक असल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

४. धान पीक व्यवस्थापन

धानाच्या रोपांना पाण्याचा पुरवठा नियंत्रित ठेवावा, तसेच जास्त पाणी झाल्यास निचऱ्याची सोय करावी.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!
आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे