
मुंबई : भारतामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाले असून दुसरा पट्टा जम्मू-काश्मीरच्या दिशेने पुढे सरकत आहे. तिसरा उत्तर प्रदेशमध्ये, चौथा पंजाबमध्ये आणि पाचवा अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार झाला आहे. यामुळे या आठवडाभर देशभरात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात आज मुसळधार तर उद्यापासून पुढील चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण पट्ट्यात पावसाचा जो
मुंबई वगळता संपूर्ण कोकण पट्ट्यात आज हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात आज रिमझिम सरी बरसतील. ठाणे, कल्याण-डोंबिवली, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. वाऱ्यांचा वेग 30-40 किमी प्रति तास असेल. उद्यापासून चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क मोडवर आहेत.
उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. विकेंडला प्रवासाची योजना करत असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी हवामान विभागाचा इशारा नक्की लक्षात घ्यावा.
पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
पुण्यात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा नाही, मात्र रिमझिम पाऊस राहील. घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
विदर्भ व मराठवाड्यात पुढील चार दिवस धोका
विदर्भ आणि मराठवाडा विभागात पुढील चार दिवस धोक्याचे राहतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.