मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. यामुळे पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे असून रत्नागिरी, रायगड ते पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईसह उपनगरात रिमझिम सरी सुरू असून नवी मुंबई, पनवेल आणि रायगड परिसरात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागानं सलग दुसऱ्या दिवशी 10 जिल्ह्यांसाठी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील 24 तास नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.
26
कमी दाबाचा पट्टा व वादळी वारे
विदर्भ आणि मराठवाडा या भागात कमी दाबाचा पट्टा (टर्फ लाइन) तयार झाला आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. ही परिस्थिती पुढील चार दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.
36
मुसळधार पावसाचा अलर्ट असलेले जिल्हे
कोकण किनारपट्टीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा, तसेच मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर कोल्हापूर आणि सातारा, तर मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि नगर जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, तसेच सखल भागातील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी. इतर भागात पावसाची संततधार सुरू राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
56
धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला
मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून, 66 हजार 357 क्युसेक पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातील आवक वाढत असल्याने विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
66
जिल्ह्यांतील पावसाचा कहर
चोपडा तालुक्यात संध्याकाळी जोरदार पावसाची सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक दिवस पावसाने दडी मारल्यामुळे पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, खामगाव शहर व परिसरातही मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली असून, काही भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.