Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
25
दुहेरी हवामान प्रणालींचा परिणाम
सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन हवामान प्रणाली सक्रिय आहेत. गुजरात-महाराष्ट्र किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. या प्रक्रियेत टर्फ लाईनची महत्त्वाची भूमिका असून ती महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून सरकत बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचत आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या आसपास नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान अस्थिर झाले आहे.
35
५ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस
हवामान विभागानुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ५ ऑक्टोबरपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
कोकण किनारपट्टी : सर्वाधिक पावसाचा जोर राहणार.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिकसह घाटमाथा भागांत पावसाची तीव्रता वाढणार.
विदर्भ व मराठवाडा : निवडक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत.
सध्याच्या प्रणाली पुढील ४८ तासांत किती तीव्र होतात हे निर्णायक ठरणार आहे. जर त्यांची तीव्रता वाढली तर त्यांचे वादळात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत अतिवृष्टीचा धोका निर्माण होऊ शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
55
सतर्कतेचा इशारा
सध्या कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला नाही. तरी हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की परिस्थिती गंभीर झाली तर पुढील ४८ तासांत रेड अलर्ट दिला जाऊ शकतो. नागरिक व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.