Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामान खात्याकडून 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Published : Sep 04, 2025, 11:22 AM IST

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि चक्रीय वातस्थितीमुळे गुरुवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. अशातच राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

PREV
15
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात आजपासून (गुरुवार) पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यासोबत चक्रीय वातस्थितीही तयार झाली आहे. या दोन्ही हवामान प्रणालींच्या परिणामामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

25
सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर आणि ठाण्यात तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील. मात्र शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि मुंबई-ठाण्यात मध्यम पावसाची शक्यता राहील.

35
कोकण किनारपट्टीसाठी इशारा

दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यास गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यास गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारपट्टी भागात जोरदार सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. पालघरमध्ये शनिवारीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

45
मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह वादळे येण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत आज पाऊस होण्याचा अंदाज आहे. परंतु उद्यापासून या भागातील पावसाचा जोर ओसरत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

55
गणेश विसर्जनानंतर दिलासा

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये हवामानाबाबत उत्सुकता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, गणेश विसर्जनाच्या दिवसानंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे विसर्जनानंतर राज्यात हवामान काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories