संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून शरद पवार भडकले, पत्रकारांना विचारला सवाल

मराठा आरक्षणावरील संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून शरद पवार पत्रकारांवर भडकले. भिडे यांनी मराठ्यांना आरक्षण का हवे असा प्रश्न उपस्थित केला होता.

Rameshwar Gavhane | Published : Aug 19, 2024 10:51 AM IST

पुणे: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असताना त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मराठ्यांना कशाला हवंय आरक्षण असा प्रश्न संभाजी भिडे यांनी केला होता. त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असे म्हणत शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच भडकले आहेत. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्यावर बोलताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार भडकले. संभाजी भिडे हे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले? मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे असे संभाजी भिडे म्हणाले होते.

तर मी राजीनामा देईन, देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे राजकारण चांगलंच तापल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण द्यायचे आहे, त्यांना सगेसोयऱ्यांच्या मुद्दा सुध्दा मान्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना विरोध आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर असे काही सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ आणि राजकारणातून निवृत्त होऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

या प्रश्नावर माझं मत असं आहे की, त्यांनी शिंदे साहेबांना विचारावे आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असे म्हटले की, मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा : 

मराठ्यांनी आरक्षण मागावे का?, संभाजी भिडेंचा सवाल; बांगलादेश हिंसाचाराला विरोध

 

Share this article