धर्मापेक्षा माणुसकी मोठी! पावसामुळे खोळंबलेल्या विवाहासाठी काझी कुटुंबीयांनी उघडले मंडपाचे दरवाजे

Published : May 22, 2025, 02:22 PM IST
Wedding

सार

लग्नाच्या एकाच मंचावर दोन पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया…

Maharashtra : मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भिजलेले शहर... आणि त्यातच खोळंबलेला संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे यांचा विवाहसोहळा. पण अशा कठीण क्षणी मोहसीन काझी आणि माहीन दिलगी यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे हा लग्नसोहळा एका संस्मरणीय क्षणात रूपांतरित झाला.

पावसामुळे उधळली सजावट, काळजीनं भरलं घराणं मंगळवार, सायंकाळी सातचा मुहूर्त... वानवडीतील राज्य राखीव पोलिस दलाच्या लॉनवर संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाहसोहळा नियोजित होता. मात्र पाचच्या सुमारास आकाशात काळं ढग दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाने सगळं लॉन जलमय केलं. सजावट उध्वस्त झाली, पाहुण्यांची तारांबळ उडाली, आणि वधू-वराला उभे राहण्यासाठी जागा उरली नाही. सर्वजण आडोशाला उभे राहून देवाला साकडं घालू लागले.

मोहसीन-माहीनच्या स्वागतसमारंभात ‘शुभमंगल सावधान’ याच लॉनच्या शेजारील मंगल कार्यालयात मोहसीन काझी आणि माहीन दिलगी यांचा स्वागत समारंभ सुरू होता. मोहसीनचे वडील, निवृत्त पोलिस अधिकारी फारुक काझी, पाहुण्यांच्या आदरातिथ्यात व्यस्त होते. संस्कृतीच्या वडिलांनी काझी कुटुंबीयांना आपल्या अडचणी सांगितल्या आणि काझी यांनीही तात्काळ माणुसकीचे दर्शन घडवत स्वतःचा कार्यक्रम थांबवून विवाहासाठी मंच उपलब्ध करून दिला.

त्यानंतर, संस्कृती आणि नरेंद्रने त्या मंचावर एकमेकांना वरमाला घालून विवाहबद्ध झाले. दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा अत्यंत हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला. त्यानंतर पुन्हा मोहसीन आणि माहीनचा स्वागत समारंभही उत्साहात साजरा करण्यात आला.

माणुसकीच्या गंगाजमुनाई तहजीबचा अनुभव “माझ्या एकुलत्या मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. पण पावसामुळे सगळं उद्ध्वस्त झालं होतं. त्या वेळी काझी कुटुंबीयांनी मदतीचा हात दिला. त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही,” अशी भावना संस्कृतीचे वडील चेतन कवडे यांनी व्यक्त केली.

“एका कार्यालयात दोन धर्मातील विवाह पार पडले. यातून धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते हे अधोरेखित झाले,” असे संस्कृतीचे काका संजय यांनी म्हटले.या अनोख्या प्रसंगाने भारतीय संस्कृतीतील ‘गंगा-जमुनी तहजीब’ प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. विविधतेतील एकता, आपुलकी, आणि सहकार्य यांचे हे मूर्तिमंत उदाहरण ठरले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!