
Maharashtra : आजपासून एअर इंडिया एक्सप्रेसने नागपूर ते बेंगळुरू दरम्यान दररोज दोन उड्डाणांची घोषणा केली आहे. नागपूरहून बेंगळुरूकडे प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इंडिगो एअरलाइन्सच या मार्गावर कार्यरत होती आणि तिला चांगला प्रतिसाद मिळत होता. नवीन सेवेमुळे प्रवाशांना अधिक पर्याय आणि अधिक उपलब्धता मिळणार आहे.
नागपूर–बेंगळुरू उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर
एअर इंडिया एक्सप्रेसने जारी केलेल्या पत्रकानुसार, बेंगळुरूहून नागपूरसाठी दररोज सकाळी ७.२५ आणि सायंकाळी ६.३० वाजता उड्डाण निघेल. नागपूरहून बेंगळुरूसाठी सकाळी १० वाजता आणि रात्री ९.०५ वाजता फ्लाइट उपलब्ध असेल. नागपूरचा समावेश झाल्याने महाराष्ट्रातील या एअरलाइन्सचे नेटवर्क अधिक विस्तारले आहे. सध्या मुंबईहून आठवड्याला १३० आणि पुण्याहून ९०हून अधिक उड्डाणांचे संचालन होत आहे.
नवी मुंबईहूनही लवकरच सुरू होणार नवीन मार्ग
एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये झपाट्याने वाढ होत असून नवी मुंबईहून लवकरच बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. अलीकडेच बेंगळुरूहून अहमदाबाद, चंदीगड, देहरादून, जोधपूर आणि उदयपूरसाठीही उड्डाणे सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये आता नागपूरचा समावेश केला गेला आहे. बेंगळुरू हे या कंपनीचे वेगाने विकसित होणारे मोठे केंद्र बनले असून येथून आठवड्याला ५३०हून अधिक उड्डाणे सुटतात.
तीन दिवसांत ६०% सीट्स बुक
या सेवेसाठीचे बुकींग सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांत ६०% सीट्स बुक झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून या मार्गावर विमानसेवेची किती मोठी मागणी आहे हे स्पष्ट होते. एअर इंडिया एक्सप्रेस १८०-सीटर विमान या मार्गावर वापरणार आहे. त्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना कमी दरात, अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.