
मुंबई : स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री न करण्याबाबत कल्याण महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, नाराजीही व्यक्त केली आहे. अशातच ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत या निर्णयावर हल्लाबोल केला.
"महाराष्ट्राला नपुंसक बनवताय" – राऊतांचा आरोप
राऊत म्हणाले, “स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज्य, हे काय धोतांड आहे? देवेंद्र फडणवीस सांगतात काही झालं की काँग्रेसच्या काळात असं होत होतं. तुमच्या स्वप्नातसुद्धा काँग्रेस आणि आम्ही बसलेलो आहोत. नेहरूंच्या काळात, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक, नामर्द बनवत आहात का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला गेले की ते वरण भात तुप खाऊन लढत होते का? ते मांसाहार करत होते. पेशवेसुद्धा मांसाहार करत होते. बाजीराव पेशवेही मांसाहार करत होते. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. सीमेवर सैन्यालाही मांसाहार करावाच लागतो. वरण भात, श्रीखंड पुरी खाऊन युद्ध नाही लढता येत. महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात. हे फतवे मागे घ्या, मराठी माणसाची संस्कृती खतम करत आहात.”
"हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा?" – राऊतांचे प्रत्युत्तर
राऊतांनी पुढे म्हटले, “स्वातंत्र्यदिनी मांसाहार नाही – तुम्ही नका खाऊ, पण लपून खाताय ना मग लोकांवर का लादत आहात? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? याविरोधात एकत्र येऊन सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.”
शरद पवार आणि रेडे कापण्याचा उल्लेख
पुढे राऊत म्हणाले, “शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ झाला? मनोहर जोशींआधी शरद पवार मुख्यमंत्री होते, त्याला किती वर्षे झाली आहेत. शरद पवारांच्या काळात अध्यादेश निघाला आहे की नाही, माहिती नाही. पण जे सरकार कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातील काही लोकांनी रेड्याचं मांस प्रसाद म्हणून खाल्लं आहे. मी हे जबाबदारीने सांगत आहे. ६५ रेडे कापले गेले आणि त्याचा प्रसाद खावा लागतो, ही तिथली प्रथा आहे. प्राणी कापल्यावर प्रसाद म्हणून मांसाहार करावा लागतो.”
फडणवीसांवर थेट निशाणा
शेवटी राऊतांनी फडणवीसांवर थेट हल्ला चढवत म्हटले, “अशा सरकारचे जनक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतात – स्वातंत्र्यदिनी शाकाहारी व्हा! हे धोतांड बंद करा.”