महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! 24 तासांत 12 जणांचा मृत्यू; अनेक भागांत पूरस्थिती

Published : Aug 01, 2026, 08:21 AM IST
Rain Alert

सार

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासोबत काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील 24 तासांत पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी, बुलढाणा, चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या सदर घटना असल्याची माहिती समोर आली आहे. 

भिवंडीतील दुर्घटनेने राज्य हादरले

सर्वाधिक गंभीर घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडली. मुसळधार पावसामुळे इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळल्याने आणखी एका व्यक्तीचा जीव गेला.

रायगड-पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी

सह्याद्री घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून रायगड जिल्ह्यातील भिरा येथे 24 तासांत सर्वाधिक 234 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय दावडी येथे 163 मिमी, डुंगरवाडी 161 मिमी, ताम्हिणी 160 मिमी, शिरगाव 95 मिमी, कोयना (पोफळी) 89 मिमी, खांड 80 मिमी, कुंडले 72 मिमी आणि निलशी येथे 67 मिमी पावसाची नोंद झाली.

पुण्यात पावसाचा जोर वाढला

पुणे शहरात सकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला होता. मात्र दिवसभरात पावसाचा जोर वाढला. IMD नुसार चिंचवड येथे 40 मिमी, लोहेगाव 20.6 मिमी, शिवाजीनगर 15.1 मिमी, पाषाण 14.8 मिमी आणि कोरेगाव पार्क येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली.

दुपारनंतरही पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू राहिला. कुर्वंडे येथे 83.5 मिमी, गिरिवन 51 मिमी, भोर 48 मिमी, पाषाण 34 मिमी, शिवाजीनगर 29.8 मिमी, हडपसर 29.5 मिमी, चिंचवड 28.5 मिमी, हवेली 25.5 मिमी, कोरेगाव पार्क 23 मिमी आणि तळेगाव येथे 13.5 मिमी पावसाची नोंद झाली.

धरणांमधून विसर्ग वाढवला

पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाने पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

अमरावतीत नद्या दुथडी भरून वाहण्यास सुरुवात

पूर्व विदर्भातील अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक