Tukaram Mundhe : महाराष्ट्राचे 'सिंघम' तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत; FDAच्या 29 अधिकाऱ्यांची मंत्र्यांकडे धाव

Published : Jul 31, 2026, 06:19 PM IST
tukaram mundhe - AI PIC

सार

Tukaram Munde FDA : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात संबंधित मंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. अतिरिक्त कामाचा ताण, दीर्घ कामाचे तास आणि मनुष्यबळाची कमतरता याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणामुळे FDA विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे 'सिंघम' म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विभागात काम करणाऱ्या २९ अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. एफडीएचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्यावर कामाचा अतिभार टाकत असल्याची तक्रार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या आक्रमक कारवाईमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. सध्या ते एफडीएचे आयुक्त असल्याने त्यांच्या धडक कारवाईमुळे महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा आहे. अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात आणि खराब अन्न देणाऱ्या लोकांवर आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि क्लब्सवर ते कारवाई करत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी देखील त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीए प्रयोगशाळेतील एकूण २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुंढे यांनी दोन पाळ्यांमध्ये (टू-शिफ्ट) काम करण्याची पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला असून, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला आहे अशी तक्रार त्यांनी केली आहे.

२१ वर्षात २५ वी बदली

आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी २५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही त्यांची २५ वी बदली होती.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी म्हटले की, एफडीएचा उद्देश जरी चांगला असला तरी त्यांच्या कार्यपद्धतीत त्रुटी आहेत. त्यांची ही कारवाई अत्यंत कठोर आहे. अधिकारी छापे टाकतात आणि त्वरित अन्न परवाने निलंबित करतात. हे पूर्णपणे चुकीचे आणि एका अर्थाने बेकायदेशीर आहे. परवाना निलंबित करण्याआधी एफडीएने संबंधित चालकांना नोटीस बजावली पाहिजे आणि नियमांचे पालन करण्यासाठी ठराविक मुदत दिली पाहिजे. तरच अन्न परवाना रद्द केला जावा, केवळ निलंबित करू नये असे त्यांनी म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले की, "सर्वांसाठी सुरक्षित आणि उच्च दर्जाचे अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चालवलेल्या उत्कृष्ट मोहिमेचे मी कौतुक करतो. सार्वजनिक आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे आणि या उद्दिष्टाप्रती सर्व संबंधित घटकांनी कटिबद्ध राहणे आवश्यक आहे."

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक