मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते उपस्थित नसल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. सर्वांना फोन केला होता, पण वैयक्तिक कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई: गुरुवारी ५ डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र, विरोधी पक्षातील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आज तक’ वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी सर्वांशी फोनवर बोललो. मी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला. परंतु वैयक्तिक कारणांमुळे ते शपथविधीला येऊ शकले नाही. सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. परंतु ते शपथविधीला आले असते तर आनंद झाला असता."
विरोधी पक्ष नेता असणार की नाही असे फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेता बनणार की नाही हे पक्ष ठरवत नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत असतात. विधानसभेचे अध्यक्ष पुर्ण परिस्थितीचे आकलन करून निर्णय घेतील. जर त्यांनी सांगितले की विरोधी पक्षनेता असायला हवा तर आमची काही हरकत नसेल. आम्ही सहमती देऊ.
मुंबई महापालिका निवडणुक महायुती एकत्र लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. परंतु स्थानिक निवडणुकांमध्ये युती करावी की नाही याचा अधिकार आम्ही लोकल कमिटीला देतो. ही निवडणुक कार्यकर्त्यांची असते नेत्यांची नसते. त्यामुळे याविषयी लोकल युनिट निर्णय घेईल. जर युतीमध्ये निवडणुक लढलो नाही तर एकमेकांच्या विरोधात बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा-
मविआ आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
महाविकास आघाडीला धक्का: समाजवादी पार्टीने साथ सोडली, अबु आझमींचे जळजळीत आरोप