आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडत आहे, मात्र या शपथविधीसाठी महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित राहिले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदारांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली. परंतु, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यावेळी शपथविधीसाठी उपस्थित राहिले नाहीत.
महाविकास आघाडीचे आमदार ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत शपथ घेण्यास नकार देत आज विधानभवनात आंदोलन करत आहेत. शपथविधी सुरु होताच, या आमदारांनी सभात्याग करत विधानभवनाच्या बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर, या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आरोप केला की, "ईव्हीएममधून गडबड करून हे सरकार स्थापन झाले आहे. महायुतीला मिळालेलं पाशवी बहुमत जनतेच्या मतांवर आधारित नाही, तर ईव्हीएमची कमाल आहे."
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी या संदर्भात स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "महाविकास आघाडीचे पक्ष ईव्हीएम घोटाळ्याचा विरोध करत आहेत आणि हा लढा न्यायालयीन मार्गाने लढण्यासाठी आम्ही एकत्र येऊ."
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत शपथविधीसाठी पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच इतर पक्षांचे आमदार या बैठकीला उपस्थित आहेत.
महाविकास आघाडीने आपल्या आरोपांची पुष्टी केली असून ते ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या अनियमिततेविरुद्ध आवाज उठवत आहेत. या मुद्द्यावर पुढील काही दिवसांत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.