शरद पवार यांना केंद्राची 'झेड प्लस' सुरक्षा मिळणार?, कारण काय? घ्या जाणून

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असून त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी ही सुरक्षा स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 21, 2024 1:37 PM IST / Updated: Aug 21 2024, 07:12 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. मात्र केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. सीआरपीएफचे काही अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात चर्चा केली. यावेळी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेत शरद पवार यांच्याशी संवाद साधला. या चर्चेअंती राज्यातील घडामोडी पाहता शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. शरद पवार यांनी ही सुरक्षा स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार करणार संपूर्ण राज्याचा दौरा

शरद पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यावर दिल्लीत एका तरुणाने हल्ला केला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.

शरद पवार यांचे तरुणाईला लाजवेल असे पक्षवाढीसाठी काम

शरद पवार हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांचा राजकारणात हिमालयाइतका अनुभव आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात शरद पवार यांचा मोठा चाहतावर्ग आहे. शरद पवार यांच्या पक्षात फूट पडून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. शरद पवार यांनी ज्या पक्षाला जन्म दिला, जो पक्ष मोठा केला तोच पक्ष त्यांच्या हातून गेला आहे. तसेच त्यांचे विश्वासातील काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या हातून त्यांचा पक्ष हिरावला आहे. पण तरीही शरद पवार यांनी संयम सोडलेला नाही. शरद पवार तरुणांनाही लाजवेल अशा जोमाने पुन्हा पक्षवाढीच्या कामाला लागले आहेत.

शरद पवार स्वत: प्रत्येक मतदारसंघाचा घेणार आढावा

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कामाला लागले आहेत. ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात जावून आढावा घेत आहेत. तसेच ते स्वत: तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. शरद पवार यांची इच्छाशक्ती खूप ताकदवान आहे. त्यांच्या याच इच्छाशक्ती आणि प्रयत्नांमुळे त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. राज्यात शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार जिंकले. विशेष म्हणजे साताऱ्याच्या जागेसाठी शेवटपर्यंत चुरस होती. या जागेवर कमी मतांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आगामी काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

ओबीसी विरुद्ध मराठा?, शेंडगेंचा 288 जागा लढवण्याचा एल्गार!

 

Share this article