मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मुंबई हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 21, 2024 10:44 AM IST

Rain News: मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या भागात होणार जोरदार पाऊस

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस/माघेगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30 ते 40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात बुधवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यात 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार

हवेचा दाब अनुकूल होत असल्यामुळे राज्यात 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. मान्सून सक्रीय होण्याची सुरूवात मुंबई व पुणे शहरातून होणार आहे. येत्या 72 तासांमध्ये या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सून 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत असे सलग तीन आठवडे सक्रिय राहणार आहे. आज (बुधवारी 21 ऑगस्ट) संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस

अधिकृत आकडेवारीनुसार मराठवाड्यात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात 20 तारखेच्या पावसाने दाणादाण उडवली असून सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. आजवर मराठवाड्यात 73 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे.

आणखी वाचा :

बदलापूर अत्याचार प्रकरणी संतापाची लाट, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Share this article