
Maharashtra police award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. राष्ट्रपतींकडून जाहीर करण्यात आलेल्या पदकांमध्ये देशातील ८७४ पोलिसांचा समावेश असून, त्यात महाराष्ट्रातील ७५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राज्यातील पोलिसांना हा सन्मान मिळणार आहे.
देशभरात एकूण ८७४ पोलिसांना राष्ट्रपती पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून ७५ पोलिसांची निवड झाली असून, यामध्ये ३१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, ४ पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल आणि ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
उल्लेखनीय सेवेसाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त बाळकृष्ण यादव, एसीपी सायरस इराणी आणि विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांनी पोलिस दलात दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.
राज्यातील ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महानिरीक्षक राजीव जैन, सुधीर हिरेमठ, अधीक्षक शीला साईल, मोहन दहीकर, पुरुषोत्तम कराड, किरण पाटील, नीलम व्हावळ, अविनाश शिलीमकर, गजानन शेळके, महेश तावडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्तव्य बजावताना धाडस आणि शौर्य दाखवलेल्या ३१ पोलिसांना शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये अमोल फडतरे, वासुदेव मडावी, मधुकर नैताम, संतोष नैताम, विलास पोर्टेट, विश्वनाथ सडमेक यांच्यासह अनेक पोलिसांचा समावेश आहे. तसेच सुधाकर वेलादी आणि कारे आत्राम यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.