Padma Award 2026 : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! ४ भूमिपुत्रांचा गौरव; वाचा कुणाला मिळाला सन्मान

Published : Jan 25, 2026, 06:53 PM IST
Padma Award this year

सार

Padma Award 2026 : केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा केली. महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा समावेश आहे. भिकल्या धिंडा, रघुवीर खेडकर, कृषी मार्गदर्शक श्रीरंग लाड आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना हा सन्मान जाहीर झाला.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. कला, संस्कृती, शेती, आरोग्य, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज व्यक्तींचा समावेश असून, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.

या सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून ज्यांना हा मान मिळाला आहे, त्यामध्ये आदिवासी तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, लोकप्रिय तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील प्रयोगशील मार्गदर्शक श्रीरंग देवबा लाड आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश आहे.

भिकल्या लाडक्या धिंडा कोण आहेत?

पालघर जिल्ह्यातील वलवंडे गावचे रहिवासी असलेले 89 वर्षीय भिकल्या लाडक्या धिंडा हे आदिवासी संस्कृतीतील नामवंत तारपावादक आहेत. त्यांनी आयुष्यभर तारपा या पारंपरिक वाद्याचे जतन, संवर्धन आणि प्रसार केला. बांबू व सुक्या भोपळ्यापासून तयार होणाऱ्या, तब्बल 9 ते 10 फूट लांबीच्या तारपाचे ते उत्कृष्ट वादकच नाहीत, तर निर्मातेही आहेत. तरुण पिढीपर्यंत ही कला पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आदिवासी संस्कृतीसाठी दिलेल्या आयुष्यभराच्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

रघुवीर खेडकर कोण आहेत?

गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तमाशा क्षेत्रात कार्यरत असलेले रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय तमाशा कलावंत आहेत. तमाशा ही लोककला जपण्यात आणि तिला महाराष्ट्राबाहेर पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तमाशातील ‘सोंगाड्या’ या भूमिकेमुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘तमाशा महर्षी’ म्हणूनही ओळखले जाते.

प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे ते सुपुत्र असून, रंगभूमीची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे नेली. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘रघुवीर खेडकर तमाशा मंडळ’ आजही लोकप्रिय आहे. त्यांच्या कलेचा गौरव म्हणून यंदा त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

श्रीरंग देवबा लाड कोण आहेत?

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावचे श्रीरंग देवबा लाड हे कृषी क्षेत्रातील क्रांतिकारक नाव आहे. त्यांना कापूस तंत्रज्ञानाचे जनक मानले जाते. शेतकरी-केंद्रित कृषी नवप्रवर्तन, स्वदेशी पशुधन संवर्धन, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.

त्यांच्या सामाजिक कार्यालाही मोठी दखल मिळाली आहे. यापूर्वी त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. याच योगदानासाठी यंदा त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

डॉ. आर्मिडा फर्नांडिस कोण आहेत?

मुंबईतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांनी आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. 1989 साली आशिया खंडातील पहिली दूध बँक स्थापन करण्याचा मान त्यांना जातो. नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशासाठी दिशादर्शक ठरले.

मुंबईतील शीव रुग्णालयात त्यांनी 25 वर्षांहून अधिक काळ बालरोग विभाग प्रमुख व डीन म्हणून काम केले. 2000 पेक्षा अधिक डॉक्टर व परिचारिकांना त्यांनी प्रशिक्षण दिले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘SNEHA’ ही संस्था स्थापन करून झोपडपट्ट्यांमधील महिला व बालकांच्या आरोग्यासाठी काम सुरू ठेवले. त्यांच्या या अफाट सेवाभावासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कार 2026 : संपूर्ण यादी

भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)

भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)

ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)

चरण हेमब्रम (ओडिशा)

चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)

डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)

कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)

महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)

नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)

ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)

रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)

रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)

राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)

सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)

श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)

तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)

अंके गौडा (कर्नाटक)

डॉ. आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)

डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)

गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)

खेम राज सुंदरियाल (हरियाणा)

मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)

मोहन नगर (मध्य प्रदेश)

नीलेश मांडलेवाला (गुजरात)

आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)

राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)

सिमांचल पात्रो (ओडिशा)

सुरेश हनगवाडी (कर्नाटक)

तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)

युनाम जात्रा सिंग (मणिपूर)

बुधरी थाठी (छत्तीसगड)

डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)

डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)

हेले वॉर (मेघालय)

इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)

के. पंजनिवेल (पुडुचेरी)

कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)

नुरुद्दीन अहमद (आसाम)

पोकिला लेकटेपी (आसाम)

आर. कृष्णन (तामिळनाडू)

एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)

तागा राम भील (राजस्थान)

विश्व बंधू (बिहार)

धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)

शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Weather Update : राज्यात हवामानाचा लपंडाव! थंडी ओसरतेय, उकाडा वाढतोय; काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी
Weather Alert : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; अवकाळी पावसाची शक्यता, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट