
नागपूर : जिथे लग्नाची सनई वाजणार होती, तिथे आता आक्रोशाचा टाहो ऐकू येत आहे. नागपूर-भंडारा महामार्गावर काळाने असा काही झडप घातली की, दोन बहिणींचा हसता-खेळता संसार आणि स्वप्नं एका क्षणात उद्ध्वस्त झाली. हळदी-कुंकवाच्या सवाष्णपणासाठी निघालेल्या दोन बहिणींवर काळाने घाला घातला असून, या भीषण अपघातात दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पिपळा डाक बंगला येथील रहिवासी अलिशा मेहर आणि त्यांची बहीण मोनाली घाटोळे या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने निघाल्या होत्या. नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगाव जवळच्या नाग नदीच्या पुलावर त्या पोहोचल्या असतानाच, मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघीही रस्त्यावर लांबवर फेकल्या गेल्या.
या भीषण धडकेत अलिशा मेहर यांचा जागीच करुण अंत झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोनाली यांना तातडीने नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. एकाच वेळी दोन तरुण मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, मृत मोनाली घाटोळे हिचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला संपन्न होणार होता. घरात लग्नाची खरेदी, पाहुण्यांची लगबग आणि आनंदाचे वातावरण होते. तर दुसरीकडे अलिशा मेहर यांचा विवाह अवघ्या सात महिन्यांपूर्वीच झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या अलिशा आणि नववधू होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मोनाली, अशा दोन्ही बहिणींच्या मृत्यूने मेहर आणि घाटोळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील अतिवेगाने या दोन कुटुंबांचा आनंद कायमचा हिरावून घेतला आहे.