Pune : पुण्यात दोन घटनेत ६५ लाखांची रोकड जप्त ; आचारसंहिता काळातील नियम जाणून घ्या नाही तर,रोकड होईल जप्त

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे 65 लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

Ankita Kothare | Published : Apr 11, 2024 11:14 AM IST

पुणे : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून १३ लाख ९० हजाराच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत १० एप्रिल रोजी दुपारी शिरुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली. सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

रोख रक्कम आणि इतर वस्तू घेऊन जाण्यासाठी नियम :

निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष उमेदवारांच्या प्रचार खर्चावर आहे. या खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यांमध्ये प्रति मतदारसंघ ९५ लाख रुपये आणि लहान राज्यांमध्ये प्रति मतदारसंघ ७५ लाख रुपये आहे. परंतु, हे नियम सामान्य नागरिकांनाही लागू होतात. उदाहरणार्थ, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, सीआयएसएफ किंवा विमानतळावरील पोलिस अधिकाऱ्यांना एखाद्या व्यक्तीकडे १० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख किंवा १ किलोपेक्षा जास्त सोने आढळल्यास प्राप्तीकर विभागाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्राप्तीकर विभाग प्राप्तीकर कायद्यानुसार आवश्यक तापसणी करते. तापसणी पूर्ण होईपर्यंत त्यांना रोख किंवा सोने जप्त करण्याचा पूर्ण अधिकार असतो. तपासणीत संशयास्पद गोष्टी आढल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होते.

चेक-पोस्टवर एखाद्या वाहनात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कोणताही गुन्हा केल्याचे, उमेदवार आणि पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे आढळून आल्यास रोख रक्कम जप्त केली जाणार नाही. परंतु, प्राप्तीकर कायद्यांतर्गत आवश्यक कारवाईसाठी प्राप्तीकर विभागाला याची माहिती दिली जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

जप्तीनंतर काय होते?

कोणतीही रोख रक्कम किंवा इतर वस्तू जप्त केल्यावर तपास केला जातो. या तपासात संबंधित व्यक्ती कोणत्याही उमेदवाराशी किंवा गुन्ह्याशी संबंधित नसल्याचे आढळल्यास रोख किंवा जप्त केलेल्या वस्तू परत केल्या जातात. “जप्त केलेली रक्कम न्यायालयाच्या निर्देशानुसार जमा केली जाईल आणि १० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख असल्यास जप्तीची एक प्रत प्राप्तिकर विभागाकडे पाठवली जाईल,” असे निवडणूक आयोगाचे सांगणे आहे.

आणखी वाचा :

पुणे येथे बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, पाच जणांना अटक

पुणे विद्यापीठात लव्ह जिहादच्या आरोपाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल

Share this article