गेल्या काही दिवसांपासून चिपळूणसह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः चिपळूण-गुहागर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मिरजोळी परिसरात महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने रस्ता नदीसारखा दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
25
नद्यांना पुर
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री आणि बाव या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
35
महामार्गावर वाहतुकीला मोठा अडथळा
चिपळूण-गुहागर महामार्गाच्या मिरजोळी भागात पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची ये-जा कठीण झाली आहे. अनेक ठिकाणी गाड्या बंद पडत आहेत. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिस सतत लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना आणि वाहनचालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळी जवळून वाहत असून प्रशासन सतर्क मोडवर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
55
बाजारपेठेवर पावसाचे संकट
जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर चिपळूण बाजार पुलाजवळील नायक कंपनीपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.