मुंबई उपनगरासह राज्यातील ठिकठिकाणी पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे हवामान खात्याने मुंबई-रायगडला रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी पुढचे सात दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, रायगडसह काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सात दिवस सलग पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
28
मुंबईत सातत्याने पाऊस सुरू
मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई या भागांत शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने जोर धरला आहे. पावसाचा जोर अधूनमधून कमी-जास्त होत असला तरी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून लोकल वाहतूकही मंदावली आहे.
38
रेड अलर्टचा इशारा
हवामान विभागाने मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवारी रेड अलर्ट जाहीर केला आहे. या दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पाच जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मंत्रालयाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
58
ढगफुटीमुळे नुकसान
अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठे नुकसान झाले. माधान गावातील रस्ते नदीसारखे झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
68
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट
मुंबई, रायगड, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील सात दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
78
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असून पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
88
मराठवाड्यात मध्यम पाऊस
बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.