Jalgaon : जळगावात खळबळ! एकनाथ खडसे यांचा मुक्ताई बंगला फोडला; सोने व रोकड चोरी

Published : Oct 28, 2025, 11:15 AM IST
Jalgaon

सार

Jalgaon : जळगावातील एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात ६-७ तोळे सोने आणि ३५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने या सलग घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.

Jalgaon :  जळगाव शहरातील शिवराम नगर भागात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता, आणि आता काहीच दिवसांनी खडसे यांच्या निवासस्थानी ही चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ६ ते ७ तोळे सोने आणि सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड** चोरीला गेली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.

नक्की काय घडले? 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमित पाहणीसाठी बंगला उघडला असता, दरवाज्याचे कुलूप तुटलेले आणि घरातील वस्तू अस्ताव्यस्त असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी तात्काळ पोलिसांना कळवले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, “बंगल्यातील सर्व रूमची कुलुपं तोडून चोरी झाली आहे. माझ्या खोलीत सुमारे ३५ हजार रुपये आणि पाच-पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. खाली नातेवाईक राहत होते, त्यांचेही सुमारे पाच तोळे सोने चोरीला गेले.” खडसे पुढे म्हणाले, “जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. चोरी, दरोडे असे प्रकार वाढले आहेत. दोन नंबरचे धंदे जोमात आहेत. पोलिसांवर टीका केली की स्थानिक मंत्री टिंगल करतात. सरकार आणि पोलिसांना घटनेचे गांभीर्य नाही.”

रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरही दरोडा

दरम्यान, ९ ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे पडले होते. यात रक्षा खडसे यांच्या मालकीचा ‘रक्षा फ्युअल’ पेट्रोल पंप, तसेच कर्की फाटा व तळवेल फाटा येथील पंपांचा समावेश होता. आरोपींनी बंदुकीच्या धाकावर रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून १.३३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेनंतर जळगाव पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते आणि नाशिक व अकोला येथे छापे टाकून सहा आरोपींना अटक केली होती.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सलग दोन मोठ्या घटनांमुळे जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांची कार्यक्षमता यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, जनतेने पोलिसांकडून अधिक कडक कारवाईची मागणी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट