
Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्राचे ‘मोंथा’ या चक्रीवादळात रूपांतर झाले असून, सध्या ते आंध्रप्रदेशातील काकीनाडा शहरापासून सुमारे ५३० किमी अंतरावर आहे. हवामान विभागानुसार, ‘मोंथा’ हे नाव थाई भाषेत ‘सुवासिक फुल’ असा अर्थ दर्शवते. हे चक्रीवादळ आगामी काही तासांत अधिक तीव्र रूप धारण करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरच्या रात्री ‘मोंथा’ तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊन आंध्रप्रदेशातील काकीनाडा किनारपट्टीवर आदळेल, त्यानंतर ते ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकेल.
सध्या बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील भागात मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) या हवामान दोलनाचा प्रभाव दिसत आहे. हा प्रभाव सध्या फेज ४ आणि ५ मध्ये सक्रिय असून, त्याची आम्प्लिट्युड २ च्या आसपास आहे.याच कारणामुळे ‘मोंथा’ चक्रीवादळाला अतिरिक्त ऊर्जा मिळत असून त्याची तीव्रता वाढत आहे. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांत या वादळाचा प्रभाव अधिक तीव्र स्वरूपात दिसून येईल.
वादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकल्यानंतर त्याचा थेट परिणाम विदर्भात तीन दिवस राहणार आहे. हवामान खात्याने सांगितले की, या काळात गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.तर नागपूर, अमरावती, वर्धा आणि अकोला परिसरात अधूनमधून पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही या वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम दिसेल, विशेषतः औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अरबी समुद्रातही एक कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, ते सध्या मुंबईच्या नैऋत्य दिशेला सुमारे ६६० किमी अंतरावर आहे आणि ईशान्य दिशेने सरकत आहे.त्याच्या प्रभावामुळे २९ ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.