उकाड्याने हैराण पुण्यात सुखसरींचे आगमन! रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीत पुणेकरांची तारांबळ

Published : May 13, 2025, 01:11 PM ISTUpdated : May 13, 2025, 01:18 PM IST
pune rains

सार

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजच्या पावसाने काहीसा दिलासा दिला, मात्र त्याचबरोबर शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या हालअपेष्टांनाही कारणीभूत ठरला.

पुणे - उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजच्या पावसाने काहीसा दिलासा दिला, मात्र त्याचबरोबर शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या हालअपेष्टांनाही कारणीभूत ठरला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच, आज अचानक झालेल्या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरला.

सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

आज सकाळपासूनच पुणे शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी १ नंतर शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सूस, पाषाण, बाणेर, बावधन, शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर, हांडेवाडी, उंड्री, कात्रज, धनकवडी, डेक्कन परिसरांमध्ये जोरदार पावसाबरोबर वादळी वाऱ्यांचा आणि विजांचा कडकडाटही झाला.

 

 

पावसामुळे वाहतुकीची कोंडी, वीजपुरवठा खंडित

पावसामुळे काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक, विशेषतः दुचाकीस्वार, रस्त्याच्या कडेला आसरा घेऊन थांबलेले दिसले. काही भागांत विजा चमकत असतानाच पावसाच्या सरी पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून गाड्यांवर पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाल्याचे देखील वृत्त आहे.

 

 

हवामान विभागाचा इशारा : १३ आणि १४ मे रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने राज्यात पुढील दोन दिवस, म्हणजेच १३ आणि १४ मे रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किमी पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः झाडांच्या आसपास पार्किंग टाळणे आणि शक्य असल्यास घरात राहणे, असा सल्ला दिला जात आहे.

मे महिन्याच्या झळाळत्या उन्हात अचानक झालेला पाऊस पुणेकरांसाठी जरी थोडा सुखद वाटला असला, तरी त्याचे दुष्परिणामही शहरवासीयांनी अनुभवले. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस पुण्यात आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

PREV

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर