
Kolhapur: सध्याच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. अजित पवार गटाच्या ग्रामपंचायत सदस्याच्या खून झाल्याची धक्कादायक घटना झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात हा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या 35 वर्षीय लखन अण्णासो बेनाडे यांचा निर्घृण खून करण्यात आला आणि यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अर्धवट जळालेल्या अवस्थेत दोन तुकडे करुन कर्नाटकातील संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकण्यात आला होता. लखन बेनाडे हे 9 जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या बहिणीने 10 जुलै रोजी गावभाग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलीस तपास सुरु असताना त्यांचा मृतदेह दोन बॉडीमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिस तपासानुसार, हा खून पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा. मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून नदीत टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस तपासात अनैतिक संबंधातून खून संशय व्यक्त केला जात आहे. काही संशयित व्यक्तींनी कोल्हापूर पोलिसांत तक्रार दाखल करत गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी पाच संशयित व्यक्तींना अटक केली असून त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. संशयितांकडून माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने तातडीने संकेश्वरकडे कूच करत तपास सुरु केला.
लखन यांचे त्यांच्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यानंतर त्यांनी 13 जून रोजी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी पत्नी आणि नातेवाईकांवर ४ लाख रुपये घेऊन पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे नवरा आणि बायको यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यांचे वादाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लखन बेनाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नंतर लढवलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या हातात अपयश आले होते. त्यामुळे 2014 आणि 2016 दोन्ही निवडणुकांवेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मात्र 2022 मध्ये रांगोळी ग्रामपंचायतीतून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.