"भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही", आव्हाड-पडळकरांमधील वादानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Published : Jul 18, 2025, 11:30 AM IST
Javed Akhtar Raj Thackeray

सार

विधीमंडळाच्या लॉबीमध्ये गुरुवारी (18 जुलै) जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. याचेच प्रतिसाद आता उमटत असून राजकरण तापले आहे. 

मुंबई : राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत 17 जुलैला झालेल्या धक्कादायक राड्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले असून, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विधानभवनातील गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, “भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटायला नको,”

काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, “काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?” राज्यात जे चाललंय त्यावरून यापुढे काहीही होऊ शकतं असं वाटायला लागलंय. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट झटापट झाली. ही स्थिती म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमच्यावर ओरडणारे आता गप्प का?

राज ठाकरेंनी थेट विचारलं की, “मराठीसाठी, मराठी माणसाच्या सन्मानासाठी जर माझ्या सैनिकांनी आवाज उठवला, तर आमच्यावर टीका करणारे आज कुठे गेले?” राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आमचं आंदोलन नेहमी भाषेच्या आणि अस्मितेच्या रक्षणासाठी असतं. विधानभवनात आमच्याच एका दिवंगत आमदारानेही एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो वैयक्तिक नव्हता, तो मराठीचा अपमान होता म्हणून होता, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

हे अधिवेशन म्हणजे तमाशा?

राज ठाकरे म्हणाले की, “अधिवेशन चालतंय की तमाशा?” एका दिवसाचा खर्च दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत, की वैयक्तिक वाद आणि नाच-गाणी करण्यासाठी? मंत्री आणि आमदार स्वतः विचारत आहेत की अधिवेशन म्हणजे औपचारिकता झालीये का? हे सगळं जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठीचं खेळ आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारला थेट आव्हान, कारवाई करून दाखवा

राज ठाकरे यांनी सरकारलाच थेट आव्हान दिलं. राज ठाकरे म्हणाले की, “जर तुमच्यात साधनशुचिता असेल, तर तुमच्याच लोकांवर कारवाई करा. नसेल केली तर, मग मात्र आमचे महाराष्ट्र सैनिक या मुजोर मराठीद्वेष्ट्यांना सरळ करतील आणि त्यावेळी आम्हाला अक्कल शिकवू नका.” 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो