
यवतमाळ | प्रतिनिधी झरी-जामनी तालुक्यातील दुर्भा गावात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनर गाडीवर कुऱ्हाडीनं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा वाद शेतीच्या मालकीवरून झाला असून गाडीचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सचिन पंचरे यांनी जिल्हा परिषदेची 14 एकर जमीन भाड्याने घेतली होती. या जमिनीची त्यांच्या नावावर अधिकृत पावती होती. त्यांनी त्या जमिनीवर पेरणी केली होती. मात्र काही गावकऱ्यांनी त्या जमिनीवर हक्क सांगत वाद घातला. वाद वाढल्यानंतर काही लोकांनी संतापात माजी आमदारांची गाडी फोडली. त्यामुळे वातावरण तापून गेलं होत.
पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. वामनराव कासावार हे काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांच्या गाडीवर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे.