
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचे आगमन यंदा अपेक्षेप्रमाणे लवकर झाले असले तरी सुरुवातीला त्याचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र, अखेर २० दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून त्याने महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि काही भागांत दमदार आगमन केल्याचे चित्र आहे.
मान्सूनरेषेचा प्रवास वेगवान
मुंबईत २६ मे रोजी मान्सून दाखल झाला होता, परंतु त्यानंतर काही काळ त्याचा वेग थांबला होता. अखेर सोमवारी मान्सूनने उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग व्यापला. सोमवारी मान्सूनरेषा वेरावळ, भावनगर, बडोदा, खारेगाव, अमरावती, दुर्गपर्यंत पोहोचली. पुढील २४ तासांत तो मध्य प्रदेश, गुजरातचा आणखी काही भाग, उर्वरित विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा व पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागांत पोहोचण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर; ऑरेंज अलर्ट
गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत पावसाचा जोर अधिक होता. कुलाबा येथे १००.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ८६ मिमी पावसाची नोंद झाली. अलिबागमध्ये ६६ मिमी, डहाणूमध्ये ८३.५ मिमी आणि रत्नागिरीत ५३.८ मिमी पाऊस पडला. सोमवारी पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबई व ठाणे जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तर मुंबईतील बोरिवली अग्निशमन केंद्रात ११४ मिमी, कांदिवलीत ८६.३ मिमी, चिंचोलीत ९२.४ मिमी, दिंडोशीमध्ये ८३.६ मिमी आणि एफ उत्तर विभागात ८६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांमध्येही अनेक ठिकाणी ८० ते १०० मिमी दरम्यान पाऊस झाला.
कोकण व घाट परिसरातही जोर कायम
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या घाटमाथ्याच्या भागांमध्ये मंगळवारीही मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगडमध्ये मंगळवारी पावसाचा जोर कमी होईल, मात्र बुधवारी पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. याचबरोबर बुधवारी ठाणे जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्यात पावसाचा जोर वाढत चालल्याने प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, शहरांतील जलमय होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.