
पुणे | प्रतिनिधी पुण्यातील एका नामवंत राजकीय नेत्याच्या कार्यालयात वीजचोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय आहे भाजपच्या शहराध्यक्षांचं – जे जनतेसाठी कायदा, शिस्त आणि पारदर्शकतेचे धडे देतात. पण त्यांच्याच कार्यालयात वीज मीटरला बायपास करून बेकायदेशीरपणे वीज वापरली जात असल्याचं समोर आलं आहे.
सामान्य नागरिक जर वीजबिल थकवलं, तर महावितरणचा कर्मचारी दुसऱ्याच दिवशी वीज तोडतो. मात्र, एका सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्याचं कार्यालय वीजचोरी करतं, आणि ते महिन्यांनमहिने सुरू असतं – ही गोष्ट म्हणजेच “नियम केवळ इतरांसाठी?” असाच प्रश्न निर्माण करते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत वीजजोड बायपास करून थेट विजेचा वापर सुरू असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकारामुळे कंपनीचे अंदाजे ₹३८,००० इतके नुकसान झालं आहे. संबंधित कार्यालयाकडून ही रक्कम वसूलही करण्यात आली आहे.
या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न समोर येतो — कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी सारखी असते का? की राजकीय पदावर असल्यामुळे एखाद्याला सूट मिळते? पुण्यासारख्या प्रबुद्ध शहरात असा प्रकार घडतो, तेव्हा इतर ठिकाणी काय होत असेल?
या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “जे जनतेला ‘स्वच्छ प्रशासन’ाचं वचन देतात, तेच नियम मोडत असतील, तर हा दुहेरी चेहरा नाही का?” असा सवाल विचारला जात आहे. सोशल मीडियावर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा प्रकार केवळ वीजचोरीचा नाही, तर विश्वासघाताचा आहे. जनतेचा विश्वास जिंकणाऱ्या नेतृत्वाने अशा प्रकारांना थारा दिला, तर खऱ्या अर्थाने पारदर्शक राजकारण कधी घडणार?