
Devendra Fadnavis on Abu Azmi : राज्यात सध्या आषाढी वारीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात मार्गक्रमण करत आहेत. अशा पवित्र पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वारी संदर्भात वादग्रस्त विधान करत राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
एका माध्यमांशी बोलताना अबू आझमी म्हणाले, "वारीमुळे रस्ता जाम होतो. आम्ही कधीही हिंदू सणांवर आक्षेप घेत नाही. मात्र आमच्या नमाज पठणाच्या वेळी विरोध केला जातो. देशात मुस्लीमांसाठी जाणूनबुजून जागा कमी केली जाते. आम्ही पुण्याहून येत असताना रस्त्यांवर पालख्या निघाल्यामुळे अडथळा झाला. तरीही आम्ही विरोध करत नाही." त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून विविध स्तरांतून टीका सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझमींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करून प्रसिद्धी मिळवायची सवय आहे. पण अशा फालतू विधानांना मी महत्त्व देत नाही. त्यामुळे अशा गोष्टींना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही." त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे भाजप आणि समाजवादी पक्षामधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली की, "2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ मेळाव्यासाठी रस्ते नेटवर्क उभारण्याची मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेतले असून आठ ते नऊ रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत." त्याशिवाय नागपूरच्या नाग नदी प्रकल्प, अंडरग्राउंड वीज वाहिन्या, खासगी बस वाहनतळ अशा अनेक प्रकल्पांचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला.
ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भक्तिभावात रंगला आहे, त्याच वेळी एका वादग्रस्त विधानामुळे वातावरणात राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. अबू आझमी यांच्या विधानांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी रोखठोक उत्तर देत हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या विधानाचा पुढील राजकीय परिणाम काय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.