
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अलीकडेच निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पक्षात स्वतःला डावलले जात असल्याची खंत त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. "मला मंत्रिपद मिळायला हवं होतं. ते मिळालं नाही, आणि याबाबत मी उद्याही तसंच बोलेन," असे ठामपणे सांगत त्यांनी आपल्या नाराजीचा पुनरुच्चार केला.
"शरद पवार यांची साथ सोडल्याचा निर्णय चुकीचा होता," हे मान्य करत भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं की त्यांना याची खंत नाही, मात्र निर्णय चुकीचा वाटतो, एवढंच ते म्हणाले. "मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी फूट पाडणाऱ्यांसोबत गेलो नाही. मी लढतो आहे. रडत बसण्यापेक्षा लढणं योग्य आहे," असा ठाम संदेश त्यांनी दिला.
संजय राऊत यांनी जाधवांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, "भास्कर जाधव आमचे सहकारी आहेत. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील." मात्र यावर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले, "संजय राऊत माझे वरिष्ठ नेते आहेत, मी त्यांचा सन्मान ठेवतो. पण वारंवार ‘सावरलं पाहिजे’ अशा शब्दांत ते बोलतात, ते जरा खटकतं."
"पक्ष मला भाषण करायला देतो की नाही, हे मला कळतं. माझ्या भाषणानंतरच राऊत आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. त्यामुळे माझ्यावर अन्याय होतोय, असा चुकीचा संदेश दिला जातो आहे," असे म्हणत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. "मी मोठा भाषणकार आहे, मला भाषण मिळालंच पाहिजे, असा गर्व माझ्या डोक्यात गेलेला नाही," असे त्यांनी ठासून सांगितले.
"सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे यांसारखे दिग्गज व्यासपीठावर असतानाही मला भाषणाची संधी दिली जाते, ही गोष्ट मला मान्य आहे. मात्र तरीही मला क्षमतेनुसार संधी दिली जात नसल्याची भावना वाटते," असे सांगून त्यांनी पक्षातील अंतर्गत असंतोष उघडपणे मांडला.
या वक्तव्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत घडामोडी गती घेत आहेत. भास्कर जाधव यांचा आत्मविश्वास आणि स्पष्टवक्तेपणा लक्ष वेधून घेत आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याकडे कशी दखल घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.